अजित पवार ३५ ते ४० आमदारांसह भाजपसोबत जाण्यास सज्ज?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखीव ठेवला आहे. तो निकाल कधीही येवू शकतो, त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार भाजप सोबच जाऊ शकतात, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ३५ ते ४० आमदार असल्याचेही सांगितले जात आहे. एकनाथ शिंदेंचे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पडू शकते, त्यामुळे भाजपसोबत (BJP) युती करून राष्ट्रवादीचे अजित पवार हे सत्तास्थापनेच्या मार्गावर आहेत, असे दावे केले जात आहेत.
न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही. मात्र, त्यांच्यासोबत गेलेल्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती मिळवावी, जेणेकरून 2019 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा जो प्रयत्न फसला तो टाळता येईल. शरद पवार भाजपसोबत जाण्यास तयार नाहीत, असेही म्हटले आहे.
शरद पवार यांनी अजित पवारांना स्वतःसांगितले की ते भाजपाशी जुळवून घेऊन त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कलंक लावायला तयार नाहीत. अजित पवार यांच्या समर्थकांना याची जाणीव आहे की शरद पवारांच्या जनभावना बदलण्याच्या क्षमतेमुळे त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरू शकते. असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार यांच्यावर दबाव आणला असल्याचे न्यू इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे.
८ एप्रिल अजित पवार यांनी अंतिम करार करण्यासाठी भाजप नेते अमित शाह यांची भेटघेतल्याचेही सूत्रांनी सांगितले, असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे हे खातेवाटपाचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्यासोबत होते, असाही दावा करण्यात आला आहे.
'महाराष्ट्रात भाजपची स्थिती अत्यंत कठीण आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावले असले तरीही उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांची लोकप्रियता वाढली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार, राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला ३३ जागा मिळतील, अशा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला महाराष्ट्र गमावणे परवडणारे नाही. त्यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून मराठा चेहरा हवा आहे. कारण त्यांच्याकडे ३५% मतदार आहे, त्यामुळे अजित पवार यांना खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे.
प्रफुल्ल पटेल सूत्रधार आहेत?
शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल नव्हते. सुनील तटकरे यांच्यासमवेत अजित पवार भाजप सोबत जाण्यासाठी पटेल मध्यस्थी भूमिका पार पाडत असल्याचे, न्यू इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार आणि 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जी भेट नुकतीच पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी भेट झाली. त्या भेटीमध्ये संजय राऊत हेही उपस्थित होते. त्यावेळी पवार म्हणाले, ''कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण 'पक्ष' म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांमध्ये सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे.'' जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडल्याचंही राऊत यांनी आपल्या सदरामध्ये म्हटले आहे. यावरुन आता उलट-सुटल चर्चा सुरु झाल्या आहेत.