आता मोबाईलवरून करता येणार रस्त्यावरील खड्यांची तक्रार;सरकारकडून तक्रारीसाठी mobile app ची निर्मिती
![]() |
Report potholes on the road through mobile app |
मुंबई : राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तसेच उखडलेल्या भागाची नागरिकांना थेट मोबाइलव्दारे छायाचित्र काढून तक्रार करता येणार आहे. त्यासाठी पीसीआरएस नावाचे Mobile app सार्वजनिक बांधकाम खात्याने गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी दिली.
राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने १ लाख ५ हजार किलोमीटरचे रस्ते बांधले असून ३३ हजार शासकीय इमारती उभ्या केल्या आहेत. विभागाचे पूल, रस्ते आणि इमारती यांच्या संदर्भातील तसेच चालू प्रकल्पांची सर्व माहिती आता पीएमआयएस (प्रोजेक्ट, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) पोर्टलव्दारे जनतेला खुली करण्यात आली आहे. सी-डॅकच्या मदतीने ही प्रणाली तयार करण्यात आली असून एक प्रकारे हा सार्वजनिक बांधकाम विभागाच डॅश-बोर्ड आहे, असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचे सनियंत्रण करणे, स्वयंचलित अहवाल बनवणे, टिपण्णी तयार करणे आदी कामे या पीएमआयएस प्रणालीमुळे सहज शक्य होणार आहेत. या प्रणालीमुळे विभाग लोकाभिमुख होईल तसेच विभागाच्या कामात पारदर्शकता येईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व माहिती अशा प्रकारे खुली करणारे महाराष्ट्र (Maharashtra) राज्य देशात एकमेव असल्याचेही त्यांनी सांगितले.