Palghar Crime News: ज्वेलर्सच्या दुकानातील सोने चांदीचे दागिने घरी घेऊन जात असलेल्या सराफाला बंदुकीच्या धाकाने लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे.रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नागझरी नाक्या पासून नागझरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निर्मनुष्य ठिकाणी दोघांनी सराफाला लुटण्याच्या उद्देशाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या,परंतु प्रसंगावधान राखत सराफ खाली वाकल्याने थोडक्यात बचावला. बंदुकीतून झाडलेल्या गोळ्या घाबरलेल्या सराफाने आरडाओरडा केल्याने चोरटे घटनास्थळा वरून पळून गेले.घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून मनोर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर पद्धतीने तपास सुरू करण्यात आला आहे.

चार वर्षांपूर्वी नागझरी नाक्यावरील दुर्वांकुर ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्याने ज्वेलर्सचे मालक भाईदास कंडी (वय.47) दररोज त्यांचे दुकान बंद करताना दुकानातील सोने चांदीचे दागिने घेऊन घरी जात होते.रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुचाकीवरून दुकानातील दागिने घेऊन नागझरी गावातील पवन विहार सोसायटी मध्ये जात होते. नागझरी नाका ते नागझरी गावा दरम्यानच्या निर्मनुष्य जागेत दबा धरून बसलेल्या दोघांनी दागिने लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या, परंतु प्रसंगावधान राखल्याने बंदुकीच्या गोळ्या भाईदास कंडी यांना लागल्या नाही.

लाखो रुपयांच्या दागिने सोबत असताना बंदुकीच्या गोळ्या झाडल्याने घाबरलेल्या भाईदास कंडी यांनी आरडाओरडा सुरू केला,नागझरी नाका नजीक असल्याने गर्दी होण्याच्या भीतीने चोरांनी अंधाराचा फायदा घेत उंच वाढलेल्या गवतातून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच मनोर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळा वरून बंदुकीच्या गोळ्यांच्या दोन रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.घटनास्थळा वरून पसार झालेल्या चोरांना पकडण्यासाठी चिल्हार बोईसर रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली आहे.दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळाला भेट देत मनोर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सतीश शिवरकर यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले.

दुर्वांकुर ज्वेलर्समध्ये चार वर्षांपूर्वी चोरी झाली होती. 05 डिसेंबर 2019 पहाटेच्या वेळी झालेल्या चोरीत दुकानाच्या छताचे पत्रे फोडून चोरट्यांनी दोन किलो चांदीचे दागिने लांबवले होते.

नागझरीत सराफा व्यापाऱ्याला बंदुकीच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न, निर्मनुष्य जागेत गाठून व्यापाऱ्यावर गोळ्या झाडल्या, प्रसंगावधान राखल्याने व्यापारी बचावला
ऑक्टोबर ०२, २०२३
0
Tags