Type Here to Get Search Results !

अबब..! 10 बाय 10 च्या टपरीला वर्षभरासाठी 30 लाखांची बोली; राज्यभर चर्चेत आलेल्या या दुकानात आहे तरी काय?

10 बाय 10 च्या टपरीला वर्षभरासाठी 30 लाखांची बोली; राज्यभर चर्चेत आलेल्या या दुकानात आहे तरी काय?

 

आतापर्यंत आपण एखाद्या आलिशान गाडीची, बंगल्याची, जमिनीची लाखोंच्या घरातील बोली पाहिल्या असतील. मात्र गावखेड्यात ग्रामपंचायतने भाड्याने देण्यासाठी बांधलेल्या 10 बाय 10 च्या चहाच्या टपरीच्या गाळ्यासाठी चक्क 30 लाखांची बोली लागलीय. अन एका पठ्ठ्याने ही स्वीकारली देखील आहे.


बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावात ही टपरी आहे. या गावची जवळपास साडेचार हजार लोकसंख्या आहे. तर या गावात ग्रामपंचायतने चार व्यापारी गाळे बांधलेले आहेत. त्यातील एका गाळ्यासाठी 11 महिन्यांसाठी चक्क 30 लाखांची बोली झालीय.


डोंगरपिंपळा ग्रामपंचायतीने गावच्या विकासासाठी व उत्पन्न मिळावे म्हणून ग्रामपंचायत कार्यालयालगत 10 बाय 10 हे गाळे बांधले आहेत. हे गाळे ग्रामपंचायतकडून 11 महिन्यांच्या करारावर भाड्याने देणे सुरू आहे. या गाळ्यात चहाची टपरी, झेरॉक्स, सलून अशी दुकाने आहेत. ग्रामपंचायतकडून नुकताच या गाळ्यांचा सार्वजनिक लिलाव झालाय. यामध्ये एका 10 बाय 10 च्या गाळ्याची चक्क 30 लाखावर बोली झाली असून दुसरी बोली ही 26 लाखांवर होती.


गावचे ग्रामसेवक नागनाथ धिरे म्हणाले की, डोंगर पिंपळा ग्रामपंचायत अंतर्गत चार गाळे आहेत. या चारही गाळ्याची बोली काल पार पडलीय. तर चार नंबरच्या गळ्यासाठी 30 लाख रुपये बोली लागली आहे. यासाठी 10 जणांनी बोलीमध्ये सहभाग घेतला होता. दोन नंबरवर 26 लाखाची बोली आहे.


ज्यांनी गाळा घेतलाय, त्यांना आम्ही पैसे जमा करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. त्यांनी जर आठ दिवसात पैसे जमा नाही केले तर ही बोली पुन्हा होणार आहे, अशी माहिती ग्रामसेवक नागनाथ धिरे आणि उपसरपंच धनराज केंद्रे यांनी दिली.


याविषयी ज्यांनी गाळा घेतला आहे, ते व्यावसायिक शिवाजी लिंबाजी काळे म्हणाले, की या बोलीमध्ये पूर्णपणे राजकारण झालंय. केवळ राजकीय द्वेषापायी ही बोली लांबली गेली. माझ्या भाच्याचं त्या चार नंबरच्या गाळ्यामध्ये अगोदरच दुकान आहे आणि त्याचा व्यवसायात जम बसलाय. यामुळे हा गाळा मिळू नये, यासाठी काही लोकांनी राजकारण केलं, आणि लाखोंवर बोली झाली. यामुळे मी ही बोली 30 लाखांवर घेऊन गेलो. मात्र प्रत्यक्षात माझ्याकडे एक लाखापेक्षा जास्त भरण्याची क्षमता नाही. त्यामुळे आता पुढील निर्णय ग्रामसेवक घेतील.


याविषयी ग्रामस्थ कृष्णा पवार यांनी म्हटलंय, की ग्रामपंचायतने एक नियम बनवला पाहिजे. 5 हजार बोलल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणी बोली लावली नाही पाहिजे. कारण की सर्वसामान्य नागरिकांना यामध्ये बोलता येत नाही. यामुळे ग्रामपंचायतीने तो विचार करून नियम बदलावा. त्याचबरोबर 11 महिन्याचा कालावधी देखील वाढवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ कृष्णा पवार यांनी केली आहे. दरम्यान या गाळ्यांच्या बोलीप्रमाणे कुणी गाळा घेईल किंवा नाही घेईल मात्र या अनोख्या बोलीनंतर बीड जिल्ह्यात चांगलीचं चर्चा रंगू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.