‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे 30 एप्रिलला बीडमध्ये मराठवाडा अधिवेशन..!
बीड: व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अधिवेशन 30 एप्रिल रोजी माँ वैष्णो पॅलेस,एमआयडीसी, बीड येथे पार पडत आहे.दिवसभर चालणार्या या अधिवेशनात मराठवाड्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत. अधिवेशनास मराठवाडा विभागातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशनाचे निमंत्रक ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी केले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन खा. प्रितम मुंडे, खा. जलील, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर,व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडीयाचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. तर, दुपारचे सत्र व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, राज्याध्यक्ष अनिल म्हस्के, टेलिव्हिजन विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे, राष्ट्रीय कार्यवाहक शंतनू डोईफोडे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार यांच्या उपस्थितीत होत आहे.
मराठवाड्यातील पत्रकारांचे अधिवेशन पहिल्यांदाच बीडमध्ये होत आहे. त्यामुळे संयोजकांकडून याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या अधिवेशनात मराठवाड्यातील प्रमुख मंत्री, बीड जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रीत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज पत्रकार देखील या अधिवेशनास उपस्थित असणार आहेत.
पत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण, पत्रकारांचे स्वावलंबन, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतरचे प्रश्न, माध्यमातील बदलते तंत्रज्ञान, आणि पत्रकारांच्या घरांचे प्रश्न या अधिवेशनात चर्चीले जाणार आहेत.
कोळगावच्या ब्लॉगरची प्रकट मुलाखत
या अधिवेनाशात सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केल्यास काय बदल घडू शकतो असे दाखवून देत कोळगाव (ता. गेवराई) हे नाव देशभरात गाजवणारे अक्षय रासकर यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. त्यातून पत्रकारांना बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे.