मार्चमधील अवकाळी नुकसानीपोटी या जिल्ह्याला सर्वाधिक मदत...
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी बीड जिल्ह्याला पाच कोटी 99 लाखाचे अनुदान मंजुर करण्यात आले आहे. या अनुदानाचे वितरण पात्र लाभार्थीना ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जाणार आहे.
बीड जिल्ह्यासह राज्यभरात मार्च महिन्यात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामध्ये शेती पिकांसोबतच शेतकऱ्यांच्या घरांचीदेखील पडझड झाली होती. राज्यभरात झालेल्या या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत करता यावी म्हणून राज्य सरकारने 176 कोटींचे अनुदान मंजुर केले आहे. बीड जिल्ह्याच्या वाट्याला यातील सहा कोटी रुपये आले आहेत. जिल्ह्यातील 8 हजार 503 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यातील 3802 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला होता. त्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने ही मदत जाहीर केली आहे.
मराठवाड्याला 84 कोटी
मार्च मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या अनुदानापोटी मराठवाडा विभागाला 84 कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. यात बीड 6 कोटी, लातुर 10.56 कोटी, धाराशिव 1.39 कोटी, छत्रपती संभाजीनगर 22.17 कोटी, जालना 3.67 कोटी, परभणी 4.37 कोटी, हिंगोली 6.04 कोटी तर नांदेड 30.52 कोटींचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.