रिंकू सिंग सफाई कर्मचारी ते IPL स्टार....
इंडियन प्रीमिअर लीगमुळे देशातील तळागळातील युवा खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ मिळालं. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून अनेक खेळाडूंनी गगन भरारी घेतली आहे आणि त्यामधला एक रिंकू सिंग ( Rinku Singh) हा आहे.अवघ्या २५ वर्षांच्या रिंकू सिंगने आपल्या आयुष्यात खूप संघर्ष पाहिला. वडील घरोघरी सीलेंडर पोहोचवायचे, मोठा भाऊ उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवायचा. क्रिकेटमध्ये नशीब चमकण्यापूर्वी रिंकू सिंगही सफाई कर्मचाऱ्याचं काम करायचा, पण आयपीएलने त्याचे नशीब पालटले.
मागील ५ वर्षांच्या कारकिर्दीत बीसीसीआयने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिंकू सिंगवर निलंबनाची कारवाई केली होती, त्यात दुखापतीनेही त्याला ग्रासले होते. पण, त्याने हार मानली नाही. रिंकूची आई मीना देवी ही त्याच्या मागे ठामपणे उभी राहिली.
रिंकूला लहान वयातच क्रिकेट खेळून नशीब बदलण्याची खात्री होती. सीलेंडर फेरीवाल्याच्या पाच मुलांपैकी एक असलेल्या रिंकूने शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पण क्रिकेट खेळण्यास वडिलांचा विरोध होता. अनेकदा वडिलांचा मारही त्याला खावा लागला होता, मात्र भावांनी रिंकूला साथ दिली.
कुटुंबाला रिंकू क्रिकेट खेळणे आवडत नव्हते, पण २०१२ मध्ये रिंकूने शाळेच्या स्पर्धेत बाईक जिंकली तेव्हा कुटुंबाचे मत बदलू लागले. सुरुवातीला रिंकूने क्रिकेटमधून कमावलेले पैसे कुटुंबाचे कर्ज फेडण्यासाठी गेले.
आयपीएलमध्ये खेळणारा अलिगढचा तो पहिला खेळाडू आहे आणि या स्पर्धेतून त्याला भरपूर पैसे मिळाले. इतके की कुटुंबातील कोणीही कधीच पाहिले नसेल. त्यातून घरच्या अडचणी दूर झाल्या. जमीन घेऊन घर बांधले, सर्व कर्ज फेडले गेले.
रिंकूने २०१७ पासून आयपीएल खेळायला सुरुवात केली. २०१७ मध्ये रिंकूला पहिल्यांदा पंजाब किंग्सने खरेदी केले होते. त्याला १० लाख रुपये मानधन मिळाले.कोलकाता नाइट रायडर्सने त्याला ८० लाख रुपयांना २०१८ मध्ये आपल्या ताफ्यात घेतले.