पुण्यातील 5 स्टार हॉटेल मधील वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; 3 दलाल अटकेत..
पुणे: मागील काही दिवसांपासून स्पा सेंटर चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यातच पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तीन दलाल व चार तरुणींना अटक करण्यात आली आहे.ताब्यात घेतलेल्या तरुणी दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. तरुणींना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे.
रवींद्रकुमार तुलशी यादव, आनंदकुमार सुक्कर यादव, अभिषेक प्रकाशचंद बेनिवाल अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. हे दलाल सोशल मीडियावरून ग्राहकांच्या संपर्कात होते. पुणे स्टेशन परिसरातील फाईव्ह स्टार हॉटेलमधील खोली बुक करून परराज्यातील तरुणींना तिथे बोलावून घेत. त्यानंतर ग्राहकांशी ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधून आर्थिक व्यवहार करत होते. ऑनलाइन वेश्या व्यवसायाची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी तुषार भिवरकर आणि अमित जमदाडे यांना मिळाली होती.
पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधून त्यांना स्टेशन परिसरातील दोन आरक्षित हॉटेलच्या खोल्यांमध्ये रंगेहाथ पकडले. दोन मुलींना तेथे बोलावून त्यांची चौकशी सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. येरवड्यात आणखी दोन मुली आणि तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली. तीन दलाल पकडले तर त्यांच्या ताब्यातून दोन मुलींची सुटका करण्यात आली. ठाण्यातील बंडगार्डे पोलिसांनी या दलालांविरुद्ध अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दोन दिवसांपूर्वी हडपसरमध्ये महिलांना वेश्याव्यवसायासाठी आणणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. याप्रकरणी आरोपी मारुती महादेव जाधव, कृष्णा दिनाकर जाधव, रमेश ढोरे, परमेश्वर काळे यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. हरपळे परिसरातील पेट्रोल पंपाजवळील एका लॉजमध्ये ढोरे हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे आढळून आले. दोन महिला, एक नवी मुंबईतील 37 वर्षांची आणि दुसरी पश्चिम बंगालची 27 वर्षांची, तिथून सुटका करण्यात आली. पोलिसांनी या लॉजची माहिती मिळताच छापा टाकला.
अवैध धंद्यावर पोलिसांची करडी नजर
पुण्यातील पोलिस अवैध धंद्यावर कारवाई करत असून, बेकायदेशीर कामांवर लक्ष केंद्रित करत आहेत. या सर्व बेकायदेशीर कामांना आळा घालण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यांचा छडा लावण्याचे काम पोलीस करत आहेत.
