लिस्टरियाच्या भीतीने संपूर्ण यूकेमधून कॅडबरी, चॉकलेट, डेझर्ट्स मागवले परत,कारण जाणून घेण्यासाठी पुढे वाचा...
युकेमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. लिस्टरियाच्या भीतीने यूकेमधील हजारो कॅडबरी उत्पादने स्टोअरमधून हटवली जात आहेत. स्काय न्यूजने म्हटले आहे की, ज्या लोकांनी या अशा स्टोअरमधून कॅडबरी उत्पादने खरेदी केली आहेत, त्यांना ते न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, लिस्टेरिया संसर्ग रोग आहे (ज्याला लिस्टेरिओसिस म्हणतात). सामान्यत: लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्सचा संसर्ग दूषित अन्नपदार्थ खाल्ल्याने होतो. गर्भवती महिला आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो, कारण जीवाणू रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात.
दुसरीकडे, यूकेची फूड स्टँडर्ड्स एजन्सी (FSA) ग्राहकांना उत्पादनांची कालबाह्यता तारीख तपासण्याचे आवाहन करत आहे. एजन्सीने क्रंची, डेम, फ्लेक, डेअरी मिल्क बटन्स आणि डेअरी मिल्क चंक्स 75 ग्रॅम चॉकलेट डेझर्ट्सबाबत अलर्ट जारी केला आहे, असे स्काय न्यूजने वृत्त दिले आहे.
तसेच, लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्सच्या संभाव्य धोक्यामुळे सावधगिरीचा इशारा, FSA ने जारी केलेल्या निवदेनात दिला आहे. लिस्टरिओसिसची लक्षणे फ्लूसारखीच असतात. सीडीसीनुसार त्यात ताप, स्नायू दुखणे किंवा वेदना, थंडी वाजून येणे किंवा थकवा जाणवणे आणि अतिसार यांचा समावेश होतो. क्वचित प्रसंगीच, संसर्गाचा अधिक गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे मेंदुज्वर सारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो. जर गर्भवती महिलेला लिस्टिरियोसिसचा संसर्ग झाल्यास गर्भपात होण्याचा धोका संभवू शकतो.